राज्यभरात अपात्र रेशन कार्डधारक शोधण्याची मोहीम 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आली असून, ती पुढील एक महिना राबविली जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासाठी अधिकृत आदेश जारी केला आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील अंत्योदय, केशरी व शुभ्र अशा सर्व प्रकारच्या रेशन कार्डांची तपासणी केली जाणार आहे.

या तपासणी मोहिमेचा मुख्य उद्देश अपात्र आणि बनावट कार्डधारकांना ओळखणे आणि त्यांच्या रेशन कार्डांना तत्काळ रद्द करणे हा आहे. विशेषतः, बांगलादेशी घुसखोर किंवा कोणताही विदेशी नागरिक जर रेशन कार्डधारक असल्याचे आढळले, तर अशा कार्डांना तात्काळ रद्द करण्यात येईल.

तपासणी प्रक्रियेसाठी प्रत्येक रेशन दुकानदाराला त्यांच्या दुकानातील कार्डांची माहिती तपासण्यासाठी फॉर्म दिले जातील. कार्डधारकांकडून वास्तव्याचा पुरावा मागवण्यात येणार आहे. ज्यांनी पूर्वी पुरावा सादर केलेला नसेल, त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात येईल. या कालावधीत पुरावा न सादर केल्यास संबंधितांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल.